Sunday, February 11, 2007

पर्वा मारत्याला म्हणलो होतो मी. ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत म्हणून. पण ऐकलं नाही माझं. गेला बाराच्या भावात म्हणजे कळेल.

आणि नारळाच्या झाडापासून लांब रहा हो, नाहीतर उगीच घोर. नही म्हणजे फ़ारसं काही नाही, पण उगीच विषाची परीक्षा कशाला पहायची? उदयिक सकळीच भैरोबाला दिव्याचा नैवेद्य दाखीव, म्हणजे सगळं नीट होईल बघ.

आणि देवाचं करणं सोडू नकोस. आपला पाठीराखा आहे तो. नाहीतर म्हातोबाच्या कोपानी आतापर्यंत सगळं खलास झालं असतं. तुझे आबा आज हयात आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे बघ.

चौकी?
पिंपळाच्या पाराच्या फ़ारच नजदीक आहे. नदीवरून थेट दिसते आर-पार अगदी. जीव थोडा थोडा होतो बघ दर वेळी. काय करावं अगदी सुचत नाई. डोक्यात सहस्त्र मुंग्या कवायत करतायत की काय वाटू लागतं.

दुसरं काही नाही रे, निरोप येतोय मला. फ़ार काळाचा सोबती नाही मी आता.

नमीची काळजी घे. तुझ्या भरवश्यावर सोडतोय मी तिला. तिला जितकं शिकायचंय शिकू दे हो, भिकंभटाजवळ मी बक्कळ पुंजी ठेवली आहे. फ़ीची बिलं दाखवलीस की तो तुला लागलीच देईल हो पैसे.. काही काळजी करू नकोस.
आणि तिला जरा त्या बबन्यापासून दूर ठेव. त्याची नजर वाईट आहे.

गेलास का तूही मला सोडून! अरे मीच आहे रे इथे, नको असा सोडून जाऊस मला, अरे तू तरी नको, तुझ्या विनवण्या करतो रे मी.

जगणं नुसतं असह्य झालंय बघ आता. माझ्या तोंडात गंगा तरी घालशील ना रे? दुसर्या कोणाला मी असं हक्कानी सांगू ?
सांग ना रे मला. आज तरी सांग. फ़ार वेळ नाही राहिलेला माझ्याकडे.

तो बघ, तो बघ!

अपशकुन! अपशकुन! माझी वेळ आली रे आली जवळ. आता काही काही उरलं नाही. सरिताला भेटलास तर तिला सांग, मी तिच्यासाठी आमरण झुरलो रे, आमरण झुरलो. मुंबईला जाऊन तीही फ़ारशी सुखी असेल असं मला वाटत नाही, पण तरी तिच्या कानावर घाल, कमीत कमी तितकंच तिला सुख. कुणीतरी आपल्यासाठी झुरावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. लग्नं वरती ठरतात हे तर सगळेच म्हणतात. माझा नाही विश्वास. सगळ्या पळवाटा आहेत. सग्ग्ळ्या पळवाटा आहेत. कुणात धमक नसते असं पतंगासारखं झुरून, जळून मरण्याची.
मी मानतो मी जीवनात फ़ारसं काही केलं नाही, पण सरिता माझं उद्दिष्ट होती रे, काय सांगू तुला? तिच्यासाठी मी द्रोणागिरि उचलून आणला असता, पण हनुमानानी तो आधीच पळवून नेला म्हणून, मी हतबल होतो रे, मी हतबल होतो.

अरे असं नुसतं म्हणून कधी काही साध्य झालंय? माई म्हणायची "अरे, नुसता ठोंब्यासारखाबसू नकोस रे, कष्ट कर. देवानी हात पाय दिलेत ना धड, उपयोग कर त्यांचा." पण मी कधी तिला आदर दाखवलाच नाही रे,
आणि आता फ़ार उशीर झालाय.

फ़ार फ़ार उशीर झालाय. गलबत खूप खूप खोल पाण्यात गेलंय. आता सहन होणार नाहे अजून. उडी मारायची पण धुगधुगी उरली नाही आता.

आता फ़क्त वाट पाहणं हाती उरलंय. फ़क्त वाट पाहणं.

मला अजून आठवतंय. दादांनी पण मला एकदा सांगितलं होतं "रघ्या, अरे जीवनाची काही शाश्वती नाही बघ. आज आहे, उद्या नाही. जो वेळ मिळालाय तो कृपा समजून नामस्मरण आणि कष्ट करण्यात व्यतीत कराव म्हणजे झालं."

मी तेंव्हा संध्या करायचो नाही. सगळं थोतांड वाटायचं मला. मी त्यांना एकदा म्हणलो पण होतो "दादा, तुमचं आयुष्य थोडं राहिलं म्हणत असाल तर एक वेळ मी ऐकेन. पण मला काही हे सगळं तुम्ही ऐकवू नका हो."

तसंच झालं रे, तसंच झालं. माई जीवनाच्या कातरवेळी एकटी पडली, तरी मला ते नाही दिसलं. सरिता छाती फ़ाडून सांगत होती, तरी मला ऐकू नाही आलं.
मी वहावतच गेलो. अजून जोरात. भोवर्यापाठोपाठ भोवर्यांत. कधीही परत न येण्यासाठी. आणि हाती काय लागलं?

जिला आपल्याच पोटच्या पोराचं क्रियाकर्म करावं लागावं अशी माता
जिला आपल्याच भावाच्या अस्थी विसर्जन कराव्या लागाव्यात अशी बहीण
जिला आपल्याच प्रियकराचं कलेवर चितेवर चढताना बघावं लागावं अशी प्रेयसी.

कुठे फ़ेडीन रे हे पाप मी? पृथ्वीवर तर नक्कीच नाही. आता तेवढा वेळच नाहीये.